
पल्लेकेले:
टी-२० विश्वचषक २०२६ च्या सुपर-८ फेरीतील अखेरच्या अटीतटीच्या सामन्यात पाकिस्तानने श्रीलंकेचा ५ धावांनी पराभव केला. मात्र, हा विजय मिळवूनही पाकिस्तानचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. नेट रन रेटच्या (NRR) जोरावर न्यूझीलंडने उपांत्य फेरीत धडक मारली असून पाकिस्तानला रिकाम्या हाताने मायदेशी परतावे लागणार आहे.
साहिबजादा फरहानचे विक्रमी शतक
प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने २० षटकांत ८ बाद २१२ धावांचा डोंगर उभा केला. सलामीवीर साहिबजादा फरहानने अवघ्या ६० चेंडूत १०० धावांची धडाकेबाज खेळी केली. यासह एकाच विश्वचषकात दोन शतके ठोकणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. त्याला फखर जमानने (८४ धावा) मोलाची साथ दिली. या दोघांनी १७६ धावांची विक्रमी सलामी दिली. मात्र, अखेरच्या षटकांत श्रीलंकेच्या गोलंदाजांनी पुनरागमन करत पाकिस्तानला २३०-२४० धावांच्या अपेक्षित धावसंख्येपासून रोखले.
पाकिस्तानचे समीकरण फिस्कटले
न्यूझीलंडला मागे टाकून उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी पाकिस्तानला श्रीलंकेला १४७ धावांच्या आत रोखणे आवश्यक होते. मात्र, श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाका आणि पवन रथनायके यांनी पाकिस्तानच्या आशांवर पाणी फेरले. श्रीलंकेने १६ व्या षटकातच १४८ धावांचा टप्पा ओलांडला आणि त्याच क्षणी पाकिस्तानचे स्पर्धेतील आव्हान अधिकृतपणे संपुष्टात आले.
अखेरच्या षटकातील थरार
विजयासाठी २१३ धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेने कडवी झुंज दिली. कर्णधार दासुन शनाकाने नाबाद ७६ (३१ चेंडू) आणि पवन रथनायकेने ५८ धावांची तुफानी फटकेबाजी केली. शेवटच्या षटकात विजयासाठी २८ धावांची गरज असताना शनाकाने शाहिन आफ्रिदीला सलग तीन षटकार लगावत सामन्यात रंगत आणली. अखेरच्या चेंडूवर ६ धावांची गरज असताना शनाका धाव काढू शकला नाही आणि श्रीलंकेचा डाव २०७ धावांवर थांबला.
न्यूझीलंड सेमीफायनलमध्ये
पाकिस्तानने सामना ५ धावांनी जिंकला असला तरी, सरस नेट रन रेटमुळे न्यूझीलंड गट २ मधून इंग्लंडसोबत उपांत्य फेरीत पात्र ठरला आहे. पाकिस्तानचा हा विजय केवळ सांत्वनपर ठरला. साहिबजादा फरहानला त्याच्या शानदार शतकासाठी ‘सामनावीर’ म्हणून गौरवण्यात आले.










