
राज्याच्या सत्ताकारणाला कलाटणी देणाऱ्या शिवसेना पक्षाच्या फुटीवर, सर्वोच्च न्यायालयात काही महिने सुरू असलेली सुनावणी बुधवारी संपेल.
शिंदे गटाच्या वतीने मंगळवारी ज्येष्ठ वकील हरीश साळवे, नीरज कौल, महेश जेठमलानी व मिनदर सिंह यांनी युक्तिवाद केला. राज्यपालांच्या वतीने महाधिवक्ता तुषार मेहता बुधवारी युक्तिवाद करणार आहेत. ‘१०-१५ मिनिटांमध्ये मुद्दे मांडू’, असे मेहता यांनी सरन्यायाधीशांना सांगितले. मेहतांनंतर ठाकरे गटाच्या वतीने प्रामुख्याने ज्येष्ठ वकील कपिल सिबल व अभिषेक मनू सिंघवी स्पष्टीकरणाचे मुद्दे मांडतील. ‘या प्रकरणाची सुनावणी बुधवारी संपवू,’ असे सरन्यायाधीशांनी सिबलांना सांगितले. सरन्यायाधीश चंद्रचूड, न्या. हिमा कोहली, न्या. कृष्ण मुरारी, न्या. एम. आर. शहा आणि न्या. पी. एस. नरसिंहा यांच्या घटनापीठासमोर ही सुनावणी होत आहे.
शिवसेनेअंतर्गत मतभेद तीव्र होण्यास उद्धव ठाकरे गट कारणीभूत आहे. त्यांनी एकनाथ शिंदे यांची गटनेते पदावरून एकतर्फी हकालपट्टी केली. त्यानंतर दोन्ही गटांमधील वाद मिटणे अशक्य होते. शिंदे गटातील आमदारांना जीवे मारण्याची धमकी दिली जात होती. त्यामुळे नाइलाजाने सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागावी लागली, असा युक्तिवाद शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी केला.
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या पाच सदस्यांच्या घटनापीठासमोर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाचे युक्तिवाद पूर्ण झाले आहेत. आता निकालाच्या तारखेबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.






