
अहमदाबाद:
टी-२० विश्वचषक २०२६ च्या ‘सुपर-८’ फेरीतील महत्त्वाच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा ७६ धावांनी धुव्वा उडवला. या पराभवासोबतच भारताची सलग १२ विजयांची विजयी घौडदौड अखेर दक्षिण आफ्रिकेने रोखली आहे. भारताच्या या पराभवामध्ये फलंदाजांचे अपयश आणि आफ्रिकेच्या गोलंदाजांचे वर्चस्व ठळकपणे दिसून आले.
अभिषेक शर्माची निराशा कायम
भारताला या सामन्यात सलामीवीर अभिषेक शर्माकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र, मागील काही सामन्यांपासून सुरू असलेला त्याचा ‘फ्लॉप शो’ या मोठ्या सामन्यातही कायम राहिला. यान्सेनच्या पहिल्याच षटकात चेंडूचा अंदाज घेण्यात अभिषेक अपयशी ठरला आणि केवळ ४ धावा काढून बाद झाला. महत्त्वाच्या टप्प्यावर सातत्याने स्वस्तात बाद होत असल्याने आता भारतीय संघ व्यवस्थापनासमोर त्याच्या जागेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

मार्को यान्सेनची ‘किलर’ गोलंदाजी
दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचा खरा शिल्पकार ठरला तो म्हणजे वेगवान गोलंदाज मार्को यान्सेन. यान्सेनने सुरुवातीलाच भारताच्या सलामीवीरांना बाद करून डावाला खिंडार पाडले. त्याने आपल्या स्पेलमध्ये टिच्चून मारा करत भारताचे ४ महत्त्वाचे गडी बाद केले. त्याच्या अतिरिक्त उसळी घेणाऱ्या चेंडूंसमोर सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या सारखे दिग्गज फलंदाजही हतबल दिसले. त्याने केवळ १८ धावा देऊन ४ बळी घेत भारताच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले.

थोडक्यात धावफलक:
* दक्षिण आफ्रिका: १८७/६ (२० षटके) – डेव्हिड मिलर ६३, ट्रिस्टन स्टब्स ३४.
* भारत: १११/१० (१८.५ षटके) – शिवम दुबे ४२, सूर्यकुमार यादव २१.
* गोलंदाजी (आफ्रिका): मार्को यान्सेन ४/१८, केशव महाराज ३/२२.
भारतासाठी धोक्याची घंटा
या मोठ्या पराभवामुळे भारताचा नेट रनरेट कमालीचा खालावला आहे. आता उपांत्य फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी भारताला आपल्या पुढील सामन्यांत केवळ विजयच नाही, तर मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागणार आहे. सलामीच्या जोडीचे अपयश ही भारतीय संघासाठी सध्या चिंतेची बाब ठरत आहे.
सामनावीर: मार्को यान्सेन (४ बळी आणि महत्त्वपूर्ण १० धावा)











