आम्ही विरोधी पक्षात बसणार – राष्ट्रवादी; शिवसेनेच्या दाबावतंत्राला धक्का

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना भलतीच आक्रमक झालेली असताना आज राष्ट्रवादी कॉंग्रेसने मात्र विरोधी पक्षात बसण्याची भूमिका जाहीर करून शिवसेनेची भाजपावरील दाबावतंत्राची पावर कमी केली.

लोकसभा निवडणुकीआधी ठरलेल्या फॉर्म्युलाप्रमाणे शिवसेनेला सत्तेत समसमान वाटा मिळावा, यासाठी शिवसेना आग्रही आहे. तसंच हा वाटा न मिळाल्यास आमच्यासमोर इतरही पर्याय खुले आहेत, असंही शिवसेना नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.

‘आम्हाला सत्ता स्थापन करण्यात रस नाही. जनतेनं आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिला आहे. तो आम्ही मान्य करतो. भाजप आणि शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी शुभेच्छा,’ असं म्हणत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी पक्षाची भूमिका जाहीर केली आहे. राष्ट्रवादीच्या या भूमिकेमुळे शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर कमी होण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्रिपदासाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला हवा, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी शिवसेनेला सत्ता स्थापनेचा अधिकृत प्रस्ताव लेखी स्वरूपात द्यावा, ज्यामध्ये ठरल्याप्रमाणे सत्तेचे समसमान वाटप असेल. त्यानंतरच सत्ता स्थापनेसंदर्भात शिवसेना चर्चा करेल, असा आक्रमक पवित्रा सेना आमदारांनी घेतला आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या या भूमिकेमुळे शिवसेनेच्या भाजपासोबतच्या दाबावतंत्राला जोरदार धक्का बसला आहे.