
भोपाळ: मध्य प्रदेशच्या राजकारणात भूकंप आणल्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ज्योतिरादित्य शिंदे उद्या भोपाळला जाऊन परवा म्हणजे 13 मार्च रोजी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले की, “जनतेची सेवा करण्यासाठी मला असं व्यासपीठ देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि जेपी नड्डा यांचे मी आभार मानतो. माझ्या आयुष्यात असे दोन क्षण आले, ज्यांनी माझं आयुष्य बदललं. पहिला क्षण होता 30 डिसेंबर 2001, ज्या दिवशी मी माझ्या वडिलांना गमावलं. दुसरी तारीख 10 मार्च 2020, जी त्यांची 75वी जयंती होती. माझं मन अतिशय दु:खी आहे. स्थापनेवेळची काँग्रेस आता राहिलेली नाही. जनतेची सेवा हेच आपलं उद्देश असायला हवं, असं माझं मत आहे. माझे वडील आणि मी याच मतावर कायम काम केलं.”
काँग्रेसला रामराम करुन ज्योतिरादित्य शिंदे यांनी अखेर आज (11 मार्च) भाजपमध्ये प्रवेश केला. राजधानी नवी दिल्लीत भाजपच्या मुख्य कार्यालयात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत ज्योतिरादित्य शिंदे यांनी कमळ हाती घेतलं.






