पहिली ते आठवीची परीक्षा रद्द; नववी, अकरावीची परीक्षा 15 एप्रिलनंतर

मुंबई:

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आज मोठे निर्णय घेतले आहेत. राज्यातील महानगरांमध्ये जीवनावश्यक वस्तूंव्यतिरिक्त सर्व दुकानं आणि कार्यालयं ३१ मार्चपर्यंत बंद राहतील, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली. त्यानंतर राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विद्यार्थ्यांसंदर्भात मोठ्या निर्णयाची घोषणा केली. पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व परीक्षा रद्द करण्याची, तर नववी आणि अकरावीच्या परीक्षा १५ एप्रिलनंतर होतील, अशी घोषणा त्यांनी केली. मात्र दहावीची परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज (20 मार्च) पत्रकार परिषद घेऊन, याबाबतची माहिती दिली. दहावी वगळता सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचे आदेश देण्याता आले आहेत. दहावीचे दोन पेपर बाकी आहेत. 21 तारखेला इतिहास आणि नागरिकशास्त्र तर 23 तारखेला भूगोलचा पेपर आहे. हे दोन्ही पेपर ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होतील.

जाहीर केलेले तीन प्रमुख निर्णय
– पहिली ते आठवीपर्यंतची परीक्षा रद्द
– नववी आणि अकरावीची परीक्षा १५ एप्रिलनंतर
– दहावी वगळता शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम