Corona Update: देशात २०६ बाधित, पाचव्या मृत्यूची नोंद

महाराष्ट्राचा आकडा 52 वर

नवी दिल्ली: देशात २०६ कोरोना रुग्ण असल्याची नोंद झाली आहे. तर महाराष्ट्रात ५२ रुग्णांवर उपचार सुरु आहे. तर देशात पाचव्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे अनेक शहरात व्यवहार बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे. जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा होणार आहे. अन्य व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहे.

भारतात आतापर्यंत प्राणघातक कोरोनाव्हायरसच्या २०६ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहे, याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी दिली.  कोविड-१९ च्या रुग्ण संख्येत वाढ होत आहे. ६७०० जणांना देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. कोरोनाबाबत काही माहिती हवी असेल किंवा मदतीची गरज असेल त्यांच्यासाठी १०७५ हा टोल फ्रि क्रमांक जारी करण्यात आला आहे. तसेच कोणीही अफवा पसरवू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे.

कोरोना व्हायरस रोखण्यासाठी प्रयत्न सुरु असताना देशात पाचव्या मृत्यूची नोंद झाली आहे. इटलीहून भारतात आलेल्या ६९ वर्षीय नागरिकाचा मृत्यू झाला आहे. भारतात सापडलेल्या कोरोना रुग्णांच्या पहिल्या बॅचमध्ये या नागरिकाचा समावेश होता. ह्दय बंद पडल्याने राजस्थानमधील जयपूरमध्ये या नागरिकाचा मृत्यू झाला, अशी माहिती पीटीआयने रुग्णालयातील अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिली आहे.