
देशासह राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता काही गोष्टी सुरु करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. तर सध्या डिसेंबरचा महिना सुरु झाला असून येत्या काही दिवसात क्रिसमस आणि नव वर्षाच्या स्वागतासाठी सर्वत्र जय्यत तयारी करण्यात येईल. मात्र याच कोरोनाच्या काळातील सर्व धर्मियांनी आपले सण अत्यंत साधेपणाने साजरे केल्याचे वेळोवेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
तर याच पार्श्वभुमीवर उद्धव ठाकरे आज (20 डिसेंबर) दुपारी 1 वाजता राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे आजच्या संवादात काय बोलणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
उद्धव ठाकरे यांनी गेल्या महिन्यात 22 तारखेला जनतेशी संवाद साधला होता. त्यानंतर आता रविवारी जनतेशी पुन्हा एकदा संवाद साधण्यासाठी ते येणार आहेत. गेल्या संवादात त्यांनी कोरोनाचे सावट अद्याप कायम आहे त्यामुळे नागरिकांनी गर्दी करु नका असे आवाहन केले होते.
तसेच आतापर्यंतच्या कोरोनाच्या काळात नागरिकांनी ज्या पद्धतीने राज्य सरकारला सहकार्य केले होते त्या पद्धतीने पुढे ही करावे अशी अपेक्षा व्यक्त केली होती. परंतु आता आजच्या संवादात उद्धव ठाकरे नव वर्षाच्या स्वागतासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या पार्ट्यांच्या संदर्भात काही बोलणार का? राज्यात नाईट कर्फ्यू लावणार का असे विविध प्रश्न आता लोकांना पडू लागले आहेत. त्यामुळे आता उद्धव ठाकरे आज कोणती घोषणा करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे






