
मुंबई:
मराठी राजभाषा गौरव दिनाचे औचित्य साधून ‘मोडीलिपी कट्टा’ तर्फे आयोजित एका विशेष सोहळ्यात ज्येष्ठ मोडीलिपी अभ्यासक भाऊराव घाडीगावकर लिखित ‘मोडीलिपी मंथन’ या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. दादर येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या प्रा. सुरेंद्र गावस्कर सभागृहात हा सोहळा उत्साहात पार पडला.
हस्ताक्षरातील मार्गदर्शक ग्रंथ
या ग्रंथाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे लेखकांनी हा संपूर्ण ग्रंथ स्वतःच्या हस्ताक्षरात साकारला आहे. मोडीलिपी शिकणाऱ्या आणि सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा ग्रंथ अत्यंत मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास याप्रसंगी व्यक्त करण्यात आला. घाडीगावकर यांनी आपल्या प्रदीर्घ अनुभवातून या लिपीची मांडणी सोप्या पद्धतींने केली आहे.
मान्यवरांची उपस्थिती

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार व प्राध्यापक हेंत सुधाकर सामंत होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. भास्कर धाटावकर उपस्थित होते. याप्रसंगी मोडीलिपी अभ्यासक सुनील कदम, श्रीमती कांचन कराई, रामकृष्ण बुटे पाटील, अरविंद काटकधोंड, अमित घाटये आणि श्री शिवजी रायगड स्मारक मंडळाचे कार्यकारिणी सदस्य अभयजी जगताप यांनीही उपस्थिती लावून आपले विचार मांडले.
मोडीलिपी संवर्धनाचा संकल्प
केवळ पुस्तक प्रकाशनच नव्हे, तर यावेळी मोडीलिपी साहित्य प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले होते. भविष्यात मोडीलिपी संवर्धनासाठी संशोधन आणि विशेष अधिवेशने आयोजित करण्याची संकल्पना यावेळी व्यासपीठावरून मांडण्यात आली.
सुयोग्य नियोजन
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. तेजस लोखंडे यांनी वैशिष्ट्यपूर्ण ‘मोडीमय’ शैलीत केले. मोडीलिपी कट्टा मंडळाचे पदाधिकारी प्रकाश डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली कमलाकर पांचाळ, किशोर सावंत, चंद्रकांत गुळंबे, विनोदकुमार व उर्मिला टेकवडे, अनिल धुरी आणि रवी गावडे यांनी कार्यक्रमाचे नेटके नियोजन केले होते. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या इतिहासप्रेमी आणि मोडीवाचकांमुळे हा सोहळा प्रेरणादायी ठरला.






