राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्या घरावर सीबीआयने छापेमारी करून गुन्हा दाखल केला

सीबीआयने आज अनिल देशमुखांच्या घर आणि कार्यालयासह 10 ठिकाणी छापे मारले आहेत. देशमुख राहत असलेल्या मुंबईतील ज्ञानेश्वरी बंगल्यातही सीबीआयने छापे मारले असल्याचं सूत्रांनी सांगितलं. रात्री उशिरा सीबीआयच्या टीमने येऊन छापेमारी केली आणि पहाटे ही टीम निघून गेली. ज्ञानेश्वरी बंगल्यातील सीसीटीव्ही फुटेजही सीबीआयने नेल्याचं सांगण्यात येतं. तसेच इतर ठिकाणीही सीबीआयने छापे मारले असून कागदपत्रांची छाननी करण्यात येत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांची 11 तास चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर सीबीआयने एक अहवाल तयार केला आहे. हा अहवाल सीबीआयने अद्याप कोर्टात सादर केला नाही. मात्र, अहवाल सादर करण्यापूर्वीच देशमुखांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

दरम्यान, देशमुख यांच्या घरावर छापेमारी झाल्यानंतर राऊत मीडियासमोर आले होते. यावेळी त्यांनी सीबीआयचा एक अजेंडा आहे. कोर्टाची ऑर्डर आहे. कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही. त्यामुळे सीबीआयच्या कारवाईवर लगेचच प्रतिक्रिया व्यक्त करणं योग्य नाही. देशमुखांनी त्यांचं म्हणणं सीबीआयकडे मांडलं आहे. सीबीआयचा प्राथमिक रिपोर्ट कोर्टाकडे जाईल. त्यानंतर काय करायचं ते पाहू, असं म्हणाले होते. सीबीआय त्यांचं काम करत आहे. कोर्टाने आपलं काम केलं आहे. महाविकास आघाडी सरकारही आपलं काम करत आहे, असंही त्यांनी सांगितलं होतं.

अचानक झालेल्या या धाडसत्रावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी शंका उपस्थित करतानाच भाजपच्या दिशेने बोटही दाखवलं आहे. दया, कुछ तो गडबड है, असं म्हणत संजय राऊत यांनी देशमुखांवरील कारवाईवरच शंका निर्माण केली आहे. 

सत्तेचा दुरुपयोग करून सरकारला बदनाम केलं जातंय; जे राजकारण सुरू आहे ते जनतेसमोर लवकरच उघड होईल – नवाब मलिक


सत्तेचा दुरुपयोग करून सरकारला बदनाम केलं जातंय. माजी गृहमंत्र्यांना बदनाम करणे हा सगळा खेळ सुरू आहे. आम्हाला न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. खरे काय आहे ते बाहेर येईलच आणि जे राजकारण सुरू आहे ते जनतेसमोर उघड होईल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे.

सीबीआयला संशय असेल तर चौकशी किंवा धाडी टाकू शकतात शिवाय गुन्हा दाखल करु शकते परंतु पहिल्या दिवसापासून ज्यापध्दतीने हे प्रकरण तयार करण्यात आले आहे यावरुन हे राजकारणच सुरू असल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने माजी गृहमंत्री अनिल देशमुख प्रकरणात प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश सीबीआयला देऊन अहवाल सादर करायला सांगितले होते. परंतु ज्यापध्दतीने आज सीबीआयने धाडसत्र सुरू केले आहे त्यावरुन मुंबई उच्च न्यायालयासमोर सीबीआयने प्राथमिक अहवाल ठेवला का? कोर्टाने गुन्हा दाखल करण्याचा निर्णय किंवा आदेश दिला आहे का? याबाबतची माहिती समोर आलेली नाही किंवा आमच्याकडे उपलब्ध नाही असे नवाब मलिक म्हणाले.

कायद्यापुढे कुणीही मोठा नाही. अनिल देशमुख यांनी सुरूवातीपासून सीबीआय चौकशीला सहकार्य केले आहे. घटना ही अंबानी यांच्या घरासमोर ठेवलेल्या बॉम्बची आहे. त्यामध्ये आजपर्यंत सचिन वाझे कुणाच्या सांगण्यावरून काम करत होता. याबाबतचा NIA ने खुलासा केलेला नाही. याशिवाय यामध्ये माजी मुंबई पोलीस आयुक्त परमवीरसिंग यांची भूमिका काय होती? त्यांच्या पत्रावरून कारवाई होतेय हे राजकारण सुरू आहे असेही नवाब मलिक म्हणाले.

अशा धाडींचा राजकीय नेत्याला बदनाम करण्यासाठीच वापर – जयंत पाटील

या धाडसत्राचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध…

न्यायालयाकडून चौकशीच्या मिळालेल्या परवानगीचा उपयोग सीबीआय धाडसत्र घालून राजकीय उद्दिष्टे साध्य करताना दिसत आहे. अशा धाडींचा राजकीय नेत्याला बदनाम करण्यासाठीच वापर होत असल्याचा आरोप करतानाच या प्रकाराचा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखत पदाचा राजीनामा दिला आणि सीबीआयच्या चौकशीला पूर्ण सहकार्य केले. याबाबतीत एकूण चार जणांची चौकशी झाली व चारही जणांनी समाधानकारक उत्तरे दिली असे सांगतानाच उच्च न्यायालयाने केवळ ‘प्राथमिक चौकशी’ करण्याचे आदेश दिलेले होते. या प्राथमिक चौकशीतून काय निष्पन्न झाले, याचा अहवाल कोर्टासमोर मांडण्यात आल्याचे अद्यापपर्यंत ऐकिवात नाही असेही जयंत पाटील म्हणाले.

ॲन्टीलिया व हिरेन हत्या प्रकरणात ज्यांना अटक करण्यात आली आणि ज्यांच्यावर संशयाची सुई आहे, त्यांच्या विधानावरून ही चौकशी सुरू करण्यात आलेली आहे. या चौकशीच्या मिळालेल्या परवानगीचा उपयोग सीबीआय धाडसत्र घालून राजकीय उद्दिष्टे साध्य करताना दिसत आहे असा आरोपही जयंत पाटील यांनी केला आहे