शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मुंबई लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी

शालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावाचे गांभीर्य व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दहावी मूल्यमापनाशी संबंधित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना उपनगरीय रेल्वेप्रवासाची मुभा दिली आहे. यानंतर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत. या निर्णयामुळे दहावी निकाल वेळेत लागण्यास मदत होईल. 

इयत्ता दहावीचा निकाल वेळेत घोषित करण्यासाठी विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे. मूल्यांकन करून विद्यार्थिनिहाय माहिती राज्य मंडळाकडे पाठवणे, श्रेणी तक्ता तयार करणे, इत्यादी कामे करण्यासाठी शिक्षकांना शाळेत उपस्थित राहणे गरजेचे आहे. त्यासाठी शालेय शिक्षण विभागाने शिक्षकांना रेल्वेप्रवासाची परवानगी देण्याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवला होता.