राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 2021 (Maharashtra Assembly Monsoon session 2021) आजपासून (सोमवार, 5 जुलै) सुरु होत आहे. राज्यातील कोरोना व्हायरस महामारीच्या पार्श्वभूमीवर अधिवेशनाचा कालावधी कमी करुन तो अवघा दोन दिवसांवर आणण्याचा निर्णय सत्ताधारी महाविकासआघाडी सरकारने घेतला आहे. त्यामुळे हे अधिवेशन अवघे दोन दिवस म्हणजे 5 आणि 6 जुलै या दिवशीच पार पडणार आहे.

अधिवेशन अगदीच कमी कालावधीचे असले तरी पाठिमागच्या वेळीप्रमाणेच याही वेळी ते वादळी ठरण्याची अधिक शक्यता आहे. विरोधी पक्षाकडून तसा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, अधिवेशनात प्रामुख्याने 3 प्रस्ताव चर्चेला येण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात प्रस्ताव, मराठा आरक्षणासाठी केंद्राचा हस्तक्षेप प्रस्ताव, ओबीसी राजकीय आरक्षणाचा मुद्द्यावर प्रस्ताव चर्चेला येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशाच्या पुर्वसंध्येला राज्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकासआघाडी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. कोरोना व्हायरस संकटाच्या नावाखाली राज्य सरकारने लोकशाहीला कुलूप ठोकण्याचे काम केले आहे. राज्य सरकार जर जनतेचे प्रश्न सभागृहात मांडू देत नसेल तर आम्ही ते जनतेच्या दरबारात जाऊन मांडू, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. सरकारने विरोधकांची कितीही कोंडी केली तरी आम्ही आमचे प्रश्न मांडत राऊ. जनतेसाठी आवाज उठवत राहू. आम्हाला कोणी रोखू शकत नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.