
राज्यातील कोरोनामुक्त गावांमध्ये पुढील आठवड्यापासून शाळा सुरु होणार आहेत. कोविड-19 संकटामुळे मागील वर्षभरापासून शाळा बंद होत्या. मात्र ऑनलाईन माध्यमातून शिक्षण सुरु होते. परंतु, आता पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे शाळा भरणार आहेत. मागील महिन्याभरापासून कोरोनाचे रुग्ण न आढळलेल्या ग्रामीण भागात 8 वी ते 12 वी पर्यंतच्या शाळा 15 जुलै पासून सुरु करण्यात येणार आहेत, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी दिली आहे.
शाळा सुरु करण्यापूर्वी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या लसीकरण होणे गरजेचे आहे. यासोबतच राज्य सरकारने जारी केलेल्या सर्व कोरोना संबंधित नियमांचे शाळांकडून पालन होणे बंधनकारक आहे, असेही त्या म्हणाल्या.
ज्या गावांमध्ये गेल्या महिन्याभरापासून कोरोनाचे रुग्ण आढळले नाहीत त्या गावात यापुढेही कोणाला कोरोनाची लागण होणार नाही, याची काळजी ग्रामपंचायतीने घेणे गरजेचे आहे. कोरोनामुक्त गाव ठरवण्यासाठी 8 सदस्यांची कमिटी नेमण्यात येणार आहे. यामध्ये जिल्हाधिकारी, शाळेतील मुख्याध्यापक आणि आरोग्य अधिकाऱ्यांचा समावेश असेल. तर ग्रामीण भागांमध्ये ग्रामपंचायतींकडून ही कमिटी चालवण्यात येईल.






