
अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाने सोमवारी सात महिन्यांतील उच्चांकी दराची नोंद केली. दिवसभरात ५७ पैशांनी वधारलेल्या रुपयाने ६९च्या आतील दर नोंदवताना ६८.५३ असा समाधानकारक टप्पा गाठला. रुपया गेल्या आठवड्यात दररोज वधारत गेला होता. घटलेली व्यापारी तूट तसेच, डॉलरचा मुबलक ओघ यामुळे सोमवारी रुपयाची स्थिती कमालीची सुधारली. एका क्षणी रुपयाने ६८.४५च्या दराची नोंद केली होती. मात्र दिवसअखेरीस तो ६८.५३वर स्थिरावला. रुपयाने गेल्या वर्षी एक ऑगस्टला ६८.४३चा दर नोंदवला होता. त्यानंतरचा हा सर्वोत्तम दर ठरला. सरकारने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार देशाच्या निर्यातीमध्ये फेब्रुवारीत २.४४ टक्के वाढ झाली असून सोने व पेट्रोलियम वस्तूंची आयात कमी झाल्याने व्यापारी तूट घटून ९.६ अब्ज अमेरिकी डॉलर नोंदवली गेली. याचा रुपयाला प्रामुख्याने लाभ झाला.











