
मुंबई : सायंकाळी 4 वाजेपर्यंतचा निवडणुकीचा निकालाचा कल पाहता जवळपास हे निश्चित झाले आहे की, परत एकदा मोदी सरकार सत्ता स्थापन करणार. भाजपाप्रणीत एनडीएने तीनशे पार जावून 345 जागावर आघाडी घेतलेली आहे. कॉंग्रेसला तर काही राज्यात आपले खाते देखील उघडता आलेले नाही. आकडेवारी पाहीली तर भाजपा 344, कॉंग्रेस 90 आणि इतर 108 अशी आहे म्हणजेच हे स्पष्ट होत आहे की, भाजपाच सरकार स्थापन करणार. इतिहासात प्रथमच भाजपाने पश्चिम बंगालमध्ये मिळवलेल यश. तृणमूल कॉंग्रेस 21 जागांवर तर भाजपा 19 जागांवर आघाडीवर आहे. संपूर्ण देशात अस एकही राज्य नाही जेथे भाजपाचा खासदार नाही. नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथून तीन लाख पंच्याएंशी मताधिकाने विजय संपादन केला आहे. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अमेठीहून पिछाडीवर असून तेथे त्यांना पराभवही पत्कारावा लागेल, तेथून भाजपाची स्मृती ईराणी आघाडीवर आहे. राहुल गांधी यांना आधीच पराभवाची चाहूल लागली होती म्हणून की काय वायनाड येथूनही उमेदवारी घेतली. वायनाडमधून राहुल गांधी आघाडीवर आहेत. रायबरेलीतून सोनिया गांधी आघाडीवर आहेत.
महाराष्ट्राचा विचार करायचा झाल्यास युतीने 40 पेक्षा अधिक जागावर आघाडी घेवून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला भुईसपाट केले आहे. शरद पवारांच्या घरात कभी खुशी कभी गम अशी स्थिती आहे. सुप्रिया सुळे जवळपास लाखाच्या मताधिकाने निवडून आल्या तर पार्थ पवार तेवढ्याच मताधिकाने पराभूत झाले आहेत. भाजपा 23 तर शिवसेना 18 जागावर आघाडीवर असल्याचे चित्र आहे. शिवसेनेने आपले मुंबई, ठाणे, कोकण आणि कल्याणचा गड राखला आहे. कोकणात राणे पॉवर दिसलेली नाही. नाशकातही समीर भूजबळ पराभूत होताना दिसत आहे. शिरूरमध्ये मात्र डॉ. अमोल कोल्हेनी शिवसेनेच्या आढळराव पाटलांचा पराभव करून शिवसेनेचा गड पाडला. सर्वात धक्कादायक म्हणजे नांदेडहून कोंग्रेसचे अशोक चव्हाण यांचा झालेला पराभव. यासर्व निकालातून एवढं मात्र नक्की की, राज फॅक्टरचा प्रभाव कुठेच दिसलेला नाही. त्यामुळे आता मनसेच काय होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. शरद पवार यांनी मात्र मनसे निवडणुकीत असता तर निकालात फरक पडला असता असे म्हटले आहे. शरद पवार यांनी आपल्या पक्षाचा पराभव मान्य केला असून मी जनमताचा आदर करतो असे म्हटले आहे.






