
वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेली न्यूझीलंडविरुद्धची दुसरी कसोटी जिंकत भारताने 372 धावांनी जिंकली. धावांच्या फरकाने मिळवलेला भारताचा हा सगळ्यांत मोठ्या अंतराचा विजय आहे.
या विजयासह भारताने दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी बाजी मारली. कानपूर येथे झालेली पहिली कसोटी अनिर्णित झाली होती.
वानखेडे स्टेडियमवर न्यूझीलंडतर्फे खेळणाऱ्या भारतीय वंशाच्या एझाझ पटेलने डावात दहा विकेट्स घेण्याचा विक्रम केला. असं करणारा तो कसोटी क्रिकेटच्या इतिहासातला केवळ तिसरा खेळाडू ठरला.
याआधी जिम लेकर यांनी 1956 मध्ये तर भारताच्याच अनिल कुंबळे यांनी 1999 मध्ये हा विक्रम रचला होता.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. एझाझ पटेल वर्चस्व गाजवत असतानाही भारतीय संघाने मयांक अगरवालच्या शतकाच्या बळावर 325 धावांची मजल मारली.
मयांकने 17 चौकार आणि 4 षटकारांसह 150 धावांची मॅरेथॉन खेळी केली. अक्षर पटेलने 52 धावा करत त्याला चांगली साथ दिली.
एझाझने 47.5 षटकात 12 निर्धाव षटकांसह 119 धावांच्या मोबदल्यात भारताच्या सगळ्या फलंदाजांना माघारी धाडलं.
प्रत्युत्तरादाखल खेळताना न्यूझीलंडचा डाव 62 धावातच गडगडला. न्यूझीलंडच्या दोनच फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली. रवीचंद्रन अश्विनने 4 तर मोहम्मद सिराजने 3 विकेट्स पटकावल्या.
भारताने न्यूझीलंडला फॉलोऑन न देता पुन्हा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या डावात भारताने 276/6 धावसंख्येवर डाव घोषित केला आणि न्यूझीलंडला 540 धावांचं लक्ष्य दिलं.
मयांक अगरवालने पहिल्या डावातला फॉर्म कायम राखत 62 धावांची खेळी केली. शुभमन गिलचं अर्धशतक तीन धावांनी हुकलं.
चेतेश्वर पुजारानेही 47 धावांची खेळी केली. अक्षर पटेलने 26 चेंडूत नाबाद 41 धावांची खेळी केली.
दुसऱ्या डावातही न्यूझीलंडची घसरगुंडी कायम राहिली. चौथ्या दिवसअखेर न्यूझीलंडची अवस्था 140/5 अशी होती. चौथ्या दिवशी 40 मिनिटात भारतीय संघाने न्यूझीलंडचा डाव गुंडाळला.
रवीचंद्रन अश्विन आणि जयंत यादव यांनी प्रत्येकी 4 विकेट्स घेतल्या.











