
नवी मुंबई: नवी मुंबईतील सामाजिक संस्था विमल फाउंडेशनचा सहावा वर्धापन दिन आज जुईनगर नवी मुंबई येथे थाटात संपन्न झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन नवी मुंबईचे माजी पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाले. कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे संस्थेच्या वर्धापनदिन निमित्ताने नवी मुंबई महानगर पालिकेचे सफाई कामगार, दहावी व बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक यांचा सत्कार गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. विमल फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाशभाऊ ढसाळ यांनी संस्थेच्या माध्यमातून होत असलेल्या विविध सामाजिक कार्याविषयी माहिती दिली. तसेच संस्थेच्या वाटचालीविषयी थोडक्यात माहिती दिली. संस्थेला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देताना गणेश नाईक यांनी विमल फौंडेशन व प्रकाश ढसाळ यांच्या कार्याचे कौतुक केले. नवी मुंबईचे प्रथम महापौर व माजी खासदार संजीव नाईक यांनीही विशेष उपस्थिती लावून संस्थेला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी नवी मुंबईतील 500 sq.ft. किंवा त्याहून कमी क्षेत्रफळ असणाऱ्या घरांना घरपट्टी म्हणजे मालमत्ता करात मुंबई महानगर पालिकेच्या धर्तीवर लवकरच माफ होणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमात सफाई कर्मचारी यांना पावसाळी रेनकोट व ज्येष्ठ नागरिक यांना छत्री वाटप करण्यात आले. दहावी आणि बारावी उत्तीर्ण विध्यार्थ्याना शैक्षणिक साहित्य वाटप करून सत्कार करण्यात आला. अवयव दान याविषयी जनजागृती करण्यासाठी कोमल फौंडेशनच्या अध्यक्ष कोमल पवार यांना आमंत्रित करण्यात आले होते. अवयव दान झाल्यामुळे त्यांचे प्राण कसे वाचले आणि त्यांनी अवयव दान विषयी जन जागृती निर्माण करण्यासाठी कसे स्वतः ला वाहून घेतले याच्या विषयी माहिती दिली.
याप्रसंगी विभागातील स्थानिक नगरसेविका तनुजा मढवी पाटील, समाजसेवक श्रीधर मढवी, विजय साळे, अण्णा पाटील, बाळू झरे, चंद्रकांत जगताप, प्रेरणा दायक वक्ते जब्बार पटेल, तसेच प्रगती फौंडेशनचे अध्यक्ष किरण राणे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी विमल फौंडेशनच्या सर्व कार्यकर्त्यांचा संजीव नाईक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धार्थ साळवी यांनी केले होते.









