
अवघ्या जगाचं लक्ष लागलेल्या ‘चांद्रयान-२’ बाहुबली रॉकेटच्या मदतीने आज अखेर अंतराळात झेपावलं. इस्रोच्या श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी ‘चांद्रयान-२’ चे प्रक्षेपण करण्यात आले. यान यशस्वीपणे अवकाशात झेपावल्यानंतर शास्त्रज्ज्ञांसह देशवासियांनी एकच जल्लोष केला.
प्रक्षेपणानंतर अवघ्या काही मिनिटांतच यान पृथ्वीच्या कक्षेत पोहोचलं, अशी माहिती इस्रोचे प्रमुख के. सिवन यांनी दिली. चांद्रयान २मधील तांत्रिक समस्या दूर करून हे यान अंतराळात पाठवलं.
चंद्राच्या पृष्ठभागावर यान उतरवून चंद्राच्या आजवर अभ्यास न झालेल्या दक्षिण ध्रुवाजवळील भागाचा अभ्यास करणाचे उद्दिष्ट आहे. चंद्रापासून ३० किलोमीटरवर गेल्यानंतर ‘चांद्रयान-२’ची गती कमी करण्यात येईल. विक्रमला चंद्राच्या भूमीवर उतरवणे अतिशय आव्हानात्मक असणार आहे. हीच शेवटची १५ मिनिटे महत्त्वाची ठरणार आहेत.
चांद्रयान-२ द्वारे लँडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान चंद्रापर्यंत जातील आणि नंतर इस्रोला लँडिगचे फोटो मिळणे सुरू होईल.






