
मुंबई : वांद्रे येथील एस. व्ही. रोडवर MTNL ची ९ मजली इमारत असून इमारतीच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर आग लागली आहे. दुपारी ३ च्या सुमारास आग लागली असून वरच्या मजल्यांवर मोठ्या प्रमाणात कर्मचारी अडकले आहेत.
किमान दोन मजल्यांवर आग भडकली असल्याने वांद्रे परिसरात धुराचे प्रचंड लोळ उठले आहेत. वांद्रे स्टेशनपर्यंत धुराचे साम्राज्य पसरले आहे. आगीच्या घटनेनंतर एस. व्ही. रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.
इमारतीत सुमारे १०० कर्मचारी अडकले असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळी तातडीने अग्निशमन दलाच्या १४ गाड्या दाखल झाल्या असून आग नियंत्रणात आणण्याचे तसेच कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.






