वैष्णोदेवी मंदिरात चेंगराचेंगरी, 12 जणांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी

जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu & Kashmir) नववर्षानिमित्त माता वैष्णोदेवी मंदिरात (Stampede at Mata Vaishno Devi Bhawan) चेंगराचेंगरी झाल्याची बातमी समोर आली आहे. यामुळे आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 20 जण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.

भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाल्याचे सांगितले जात आहे. त्रिकुटा टेकडीवर असलेल्या मंदिराच्या परिसरात ही घटना घडली. मिळालेल्या माहिती नुसार नवीन वर्षाच्या प्रारंभानिमित्त भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे.

दरम्यान, चेंगराचेंगरी झाली. मिळालेल्या वृत्तानुसार अधिका-यांनी सांगितले की अनेक लोक मृत आढळले आणि त्यांचे मृतदेह ओळख आणि इतर कायदेशीर औपचारिकतेसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. जखमींना माता वैष्णोदेवी नारायण सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलसह इतर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अनेक जखमींची प्रकृती चिंताजनक आहे.