
मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई येथे काल रात्री पासून सुरु झालेला पाऊस अजूनही सुरु आहे. मुंबई उपनागरापेक्षा मुंबई शहर आणि नवी मुंबई परिसरात पावसाने जोरदार बॅटींग केली आहे.
दक्षिण मुंबई आणि परिसराला बुधवारी मध्यरात्री पावसाने झोडपून काढलं असून ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. मंगळवारी रात्री साडे अकराच्या सुमारास सुरू झालेला पाऊस बुधवार पहाटेपर्यंत कायम आहे.
दादरच्या हिंदमाता परिसरात पाणीच पाणी झालं असून बुधवारी सकाळी वाहतुकीचा बोजवारा उडणार आहे. कुलाबा येथे रात्री ११ ते १ वाजेपर्यंत अवघ्या दोन तासांत ५२ मिमी पावसाची नोंद झाली.
हवामान खात्यानेही पुढील चार तासांत मुंबई शहर, उपनगर आणि ठाणे परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला. दक्षिण मुंबईत मध्यरात्रीपासून ते पहाटेपर्यंत पावसाने चांगलीच हजेरी लावली असून पाऊस न थांबल्यास रेल्वे सेवेवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
पावसाचा जोर सकाळीही पाहायला मिळत आहे त्यामुळे कामावर जाणारे चाकरमानी आणि शाळेत जाणाऱ्या मुलांची तारांबळ उडणार हे नक्की.






