
वेस्ट इंडिजविरुद्ध (West Indies) कोलकाताच्या ईडन गार्डन्स (Eden Gardens) येथे झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात यजमान भारताने (India) सर्व क्षेत्रात वर्चस्व गाजवले आणि 6 विकेटने सहज विजय मिळवला.
विंडीज संघाने पहिले फलंदाजी करून यजमान संघासमोर 158 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात भारतीय संघाला (Indian Team) बॅटने काहीसा संघर्ष करावा लागला, पण चांगल्या सुरुवातीचा फायदा घेत रोहित ब्रिगेडने 18.5 षटकांत 6 गडी राखून विजय मिळवला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारतीय संघासाठी कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) 40 आणि ईशान किशनने 35 धावांचे योगदान दिले. तर सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) 34 धावा आणि व्यंकटेश अय्यरने (Venkatesh Iyer) नाबाद 24 धावा करून मालिकेतील पहिल्या विजयाचा मान यजमान संघाला मिळवून दिला. दरम्यान विंडीज गोलंदाज विजयासाठी प्रयत्नशील होते, पण अखेरीस त्यांच्या हाती पराभवाची निराशा आली.











