
ठाणे: मुसळधार पाऊस आणि उल्हास नदीला आलेल्या पुरामुळं ‘महालक्ष्मी एक्स्प्रेस’ शुक्रवारी रात्रीपासून चामटोली गावाजवळ अडकली होती. पुराचे पाणी वाढत असल्यानं प्रवाशांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण होतं. परिस्थितीची माहिती मिळताच प्रशासकीय यंत्रणांनी तातडीनं हालचाल करून मदत व बचावकार्याला सुरुवात केली. जिल्हाधिकारी स्वत: सकाळपासून संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. एनडीआरएफच्या जवानांनी दुपारी बाराच्या सुमारास मदतकार्य सुरू केले. त्यांना अन्य यंत्रणांबरोबरच स्थानिक नागरिकांची साथ मिळाली. त्यानंतर दुपारी तीन वाजेपर्यंत सर्व प्रवाशांना रेल्वेबाहेर काढण्यात आलं.
पुराच्या पाण्यात अडकलेल्या ‘महालक्ष्मी एक्स्प्रेस’मधील सर्व १०५० प्रवाशांची अखेर सुखरूप सुटका करण्यात आली आहे. सर्व प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. एनडीआरएफ, नौदल, हवाई दल, पोलीस यांच्याबरोबरच स्थानिक नागरिकांच्या मदतीमुळं हे बचावकार्य अवघ्या तीन ते साडेतीन तासांत पार पडले.






