
सेनेलाही बंडाळीचा फटका; आमदार करणार राष्ट्रवादीत प्रवेश?
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांच्यासारखा मोठा मासा गळाला लागल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील काही आमदार सेनेत येणार आहेत. सोलापूर जिल्ह्यातील बबन शिंदे हे ज्येष्ठ आमदारही सेनेच्या वाटेवर आहेत.
नागपूर काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी वस्त्रोद्योग मंत्री सतीश चतुर्वेदी यांचा मुलगा दुष्यंत चतुर्वेदी शिवसेनेत प्रवेश करणार असल्य़ाचं सांगण्यात येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते खासदार सुनील तटकरे यांचे भाऊ अनिल त्यांच्यावर नाराज आहेत. घरातील या नाराजीचा लाभ घेत अनिल यांचे पुत्र अवधूत यांनी सेनेत प्रवेशाचे ठरवले आहे.
दरम्यान राज्यभरातील नेते खेचण्याच्या स्पर्धेत भाजपही आहेच. माजी मंत्री राष्ट्रवादीचे नेते राणा यांना भाजपई केले जाणार आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादीप्रमाणे शिवसेनेलाही बंडाळीचा फटका बसण्याची चिन्हे दिसत आहेत. शिवसेनेचे वरळीचे आमदार सुनील शिंदे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशानं सुनील शिंदे नाराज असल्याचे बोलले जात आहे. शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधल्याचेही सांगण्यात येत असून लवकरच ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील अशी माहिती देण्यात आली आहे.






