
नवी मुंबई: आज दुपारी नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांनी आपल्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ५२ नगरसेवकांची बैठक बोलावली असून या बैठकीत भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
नगरसेवकांचा तसा दबाव गणेश नाईक यांच्यावर वाढत असल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे. असे झाल्यास नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठे खिंडार पडणार आहे.
माजी मंत्री गणेश नाईक राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५२ नगरसेवकांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीत महापालिका प्रभागांनुसार झालेले मतदान पाहिले असता, प्रत्येक प्रभागात शिवसेनेने आघाडी मिळवले असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. या मुळेच राष्ट्रवादी काँग्रेसला नवी मुंबईत धोका निर्माण झाला असून पुढील महापालिका निवडणुकीत पक्षाला मोठा फटका बसू शकतो असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांचे मत आहे.
नगरसेवकांच्या या मताशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संदीप नाईक सहमत असल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे. अलिकडच्या काळात संदीप नाईक यांच्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या भेटी वाढल्या असून ते देखील गणेश नाईक यांचे मन वळवण्याच्या प्रयत्नात असल्याचे बोलले जात आहे.






