
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. त्यानिमित्त आज दिवसभर सर्वत्र भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. विशेष करून शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्ष या दोन्ही पक्षांकडून आज दिवसभरात विविध समाजउपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आलंय. दोन्ही गटाकडून आज जोरदार शक्तिप्रदर्शनही केले जाणार आहे.
शिवसेनेच्या दोन्ही गटाचे प्रमुख नेते त्यांच्या भाषणात काय बोलणार याकडे सर्वाचे लक्ष लागलंय.
शिवसेनाप्रमुखांच्या आजच्या जन्मदिनी एक निर्धार प्रत्येकाने केलाच पाहिजे, तो म्हणजे शिवसेनाप्रमुखांच्या नावे सुरू झालेला ढोंगाचा बाजार कायमचा गाडण्याचा व संपवण्याचा. बाळासाहेबांच्या जन्मदिनी गंगेच्या प्रवाहातील ओंडके आपोआप दूर झाले व काशीच्या हरिश्चंद्र घाटावर पोहोचले. त्या घाटावर त्यांची राजकीय चिता पेटेल हीच बाळासाहेबांना त्यांच्या जन्मदिनी विनम्र आदरांजली’ अशा शब्दांत शिवसेनेनं शिंदे गटावर टीकास्त्र सोडलं आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. या जयंतीच्या निमित्ताने शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनामधून पुन्हा एका शिंदे गटावर जोरदार टीका करण्यात आली आहे.
सध्या महाराष्ट्रात एक भलतेच राजकारण सुरू झाले आहे. त्यात शिवसेनाप्रमुखांची चोरी करण्याचा विषय प्रामुख्याने आहे, पण या चोरीमारीस देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री वगैरे लोकांनी हातभार लावावा याचे आश्चर्य वाटते. महाराष्ट्राला ढोंग मान्य नाही. शिवसेनाप्रमुख तर नेहमीच ढोंगबाजांच्या कंबरड्यात लाथा घालीत राहिले. ढोंगबाजांचे मुखवटे त्यांनी जाहीरपणे फाडले, पण गेल्या पाचेक महिन्यांत महाराष्ट्रात ढोंगबाजीने कहर केला आहे. शिवसेनेचे मुखवटे लावून काही मंबाजी सत्तेत घुसले व त्यांनी मंदिरातून देव चोरावेत तसे शिवसेनाप्रमुख चोरण्याचा प्रयत्न केला. पुन्हा या चोरीत कोणतेही अडथळे येऊ नयेत यासाठी चोरांना पाठबळ व कवच देण्याचे काम देशाचे पंतप्रधान व गृहमंत्री करताना दिसत आहेत’ असा आरोपही सेनेनं केला.
लाचारी व गुलामीची हद्द पार करीत त्यांनी भाजपच्या व्यासपीठावरूनच जाहीर केले, ‘‘होय, होय, आम्ही मोदींची म्हणजे मोदींची माणसं आहोत?’’ इतके सर्व स्पष्ट झाल्यावर लोकांना कळलेच असेल की, शिवसेना खतम करण्याचे किती मोठे कारस्थान भाजप व त्यांच्या हस्तकांनी रचले होते. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी कबुलीच दिली, ‘‘आमचे नाते मोदींशी!’’ मग बाळासाहेबांचे नाव का घेता व विधानसभेत शिवसेनाप्रमुखांच्या तैलचित्र अनावरणाचे जे ढोंग रचले गेले आहे ते कशासाठी? एकतर तैलचित्रात निष्ठेच्या तेजाचा अंश नाही व ज्या महाराष्ट्राच्या विधानसभेत शिवसेनेच्या बाबतीत बेइमानी केली, त्याच विधानसभेत तैलचित्र लावून महाराष्ट्रापुढे कोणते चित्र रंगवीत आहात? विधानसभेत बाळासाहेबांचे तैलचित्र लावणे हे एक ढोंग आहे’ अशी टीकाही सेनेनं केली.
आज सकाळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानातील स्मृतीस्थळावर शिवसैनिक तसंच लोकप्रतिनिधी अभिवादन करण्यासाठी येणार आहेत. त्याच बरोबर कुलाबा रिगल सिनेमा सर्कल येथील शिवेसनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे संध्याकाळी कुटुंबासह येणार आहेत.
तसंच याच ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील दुपारी अभिवादन करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळत आहे. शिवेसनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मेळावा माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात ‘बाळासाहेबांच्या लेकी’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या दोन्ही कार्यक्रमात शिवसेनेच्या दोन्ही गटाचे प्रमुख नेते त्यांच्या भाषणात काय बोलणार याकडे सर्वाचे लक्ष लागलंय.






