अमरावतीहून भाजपाची ‘महाजनांदेश यात्रा’ सूरु; भाजपा हाऊसफुल्ल, नो एन्ट्री – सी.एम. देवेंद्र फडणवीस

अमरावती: सध्या महाराष्ट्रात यात्रा महोत्सव साजरा होत आहे. शिवसेनेची जनाशिर्वाद यात्रा नंतर भाजपाची महा जनादेशयात्रा आजपासून अमरावतीहून सुरू झाली आहे. लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही शिवराज्य यात्रा सुरू होणार असल्याचे कळते.

आज अमरावतीतून ‘महाजनादेश’ यात्रेला सुरुवात करून भाजपनं विधानसभा निवडणुकीचा बिगुलही फुंकला.

या महाजनादेश यात्रेच्या पहिल्याच सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या पाच वर्षात भाजप-शिवसेना युती सरकारने केलेल्या कामांची जंत्री मांडतानाच काँग्रेस-राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली. यावेळी देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही उपस्थित होते. 

दरम्यान भाजपमध्ये गेल्या काही दिवसांत इतर पक्षांतून येणाऱ्या नेत्यांचा ओघ सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये जागा फुल्ल झाल्यात, आता भरती नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे स्पष्ट केलं.