तिसऱ्या टी20 विजयासह भारताचा वेस्ट इंडीज विरुद्ध 3-0 मालिका विजय

गयाना: तिसऱ्या टी 20 सामन्यात नाणेफेक जिंकून विराट कोहलीने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. वेस्ट इंडीजने प्रथम फलंदाजी केली. वेस्ट इंडिजने दिलेल्या १४७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर शिखर धवन अवघ्या ३ धावांवर झेलबाद झाला. ओशाने थॉमस याने धवनला माघारी धाडत भारताला पहिला धक्का दिला. रोहित शर्माच्या जागी संघात स्थान दिलेल्या लोकेश राहुलला फारशी चमक दाखवता आली नाही. तो २० धावा काढून तंबूत परतला. यानंतर कर्णधार विराट कोहली आणि ऋषभ पंत यांनी संयमी फलंदाजी करत भारताचा डाव सावरला. संधी मिळेल तेव्हा फटकेबाजी करत भारताला विजयाच्या समीप नेले. या दरम्यान कर्णधार विराट कोहलीने आपले अर्धशतक पूर्ण केले. भारत विजयाच्या उंबरठ्यावर असताना विराट कोहली बाद झाला. त्याने ५९ धावा केल्या. यानंतर ऋषभ पंतने मोर्चा सांभाळत अर्थशतक पूर्ण केले आणि मनीष पांडेच्या साहाय्याने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

वेस्ट इंडिजच्या डावाची सुरुवात पुन्हा एकदा खराब झाली. सलामीवीर सुनील नरिन २ धावा काढून बाद झाला. यानंतर एव्हिन लुइस आणि शॅमरॉन हेटमेयर झटपट बाद झाले. यानंतर मैदानात उतरलेल्या कायरन पोलार्ड आणि निकोलस पूरन यांनी काही काळ विंडीजचा डाव सावरला. मात्र, नवदीप सैनी याने पूरनला बाद करून ही जोडी फोडली. कायरन पोलार्डने एका बाजूने खिंड लढवत ठेवत अर्धशतक पूर्ण केले. संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेण्यात तो अपयशी ठरला. पोलार्ड ५८ धावा काढून तंबूत परतला. भारतीय गोलंदाजांसमोर वेस्ट इंडिजच्या फलंदाजांचा टिकाव लागला नाही आणि निर्धारित २० षटकांत ६ गड्यांच्या मोबदल्यात वेस्ट इंडिजचा संघ १४६ धावा करू शकला. भारताकडून दीपक चहरने ३, नवदीप सैनीने २, तर राहुल चहर याने १ बळी टिपला.

या विजयासह भारताने 3-0 असे निर्भेळ यश मिळवले.