माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचं दुःखद निधन; हृदय विकाराच्या झटक्याने प्राण ज्योत विझली

नवी दिल्ली: देशाच्या माजी परराष्ट्रमंत्री आणि भाजपाच्या प्रभावशाली नेत्या सुषमा स्वराज यांचं आज वयाच्या67व्या वर्षी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, शिवसेनेचे खासदार संजय राऊत तसेच अनेक नेत्यांनी सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे.

सुषमा यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. हृदयविकाराचा त्रास होऊ लागल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पाच डॉक्टरांचं पथक त्यांच्यावर उपचार करत होतं. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र त्यात यश आलं नाही. तिथे सुषमा यांनी प्राणज्योत मालवली. सुषमा यांच्यासोबत त्यांचे पती व कुटुंबातील अन्य सदस्य होते. सुषमा बऱ्याच काळापासून आजारी होत्या. त्यांचं किडनी ट्रान्सप्लांटही झालं होतं.

जम्मू-काश्मीरला कलम ३७० च्या जोखाडातून मुक्त करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल तसेच जम्मू-काश्मीरचं विभाजन करणारं विधेयक संसेदत मंजूर करून घेण्याची ऐतिहासिक कामगिरी केल्याबद्दल सुषमा यांनी आज सायंकाळी साडेसात वाजता ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले होते