टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी रवी शास्त्रीच

मुंबई: विश्वचषकाच्या सेमी फायनलमध्ये भारताचा पराभव झाल्यानंतर प्रशिक्षक म्हणून शास्त्री यांच्यावर टीकेची झोड उठली होती. तर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने शास्त्रींनाच प्रशिक्षकपदी कायम ठेवण्याचं मत सल्लागार समितीकडे मांडलं होतं. त्यामुळे टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदावरून शास्त्री जाणार की राहणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.

माजी क्रिकेटपटू कपिल देव, अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी यांच्या त्रिसदस्यीय क्रिकेट सल्लागार समितीने एक पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत अनेकजण होते. त्यांच्या मुलाखतीही घेण्यात आल्या. या शर्यतीत न्यूझीलंडचा क्रिकेटपटू माइक हेसन दुसऱ्या क्रमांकावर होता. तर ऑस्ट्रेलियाचा टॉम मुडी तिसऱ्या क्रमांकावर होता. समितीतील तिन्ही सदस्यांनी प्रशिक्षकपदाच्या स्पर्धेतील प्रत्येक उमेदवारांना वेगवेगळे गुण दिले होते. त्यात शास्त्रींच्या पारड्यात सर्वाधिक गुण पडल्याने टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी त्यांचीच निवड करण्यात आली असल्याचं सल्लागार समितीचे सदस्य कपिल देव यांनी सांगितलं.