
मुंबई : भारतीय जनता पक्ष व शिवसेना यांच्यातील जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली असून भाजपने दोन पावले पुढे येत शिवसेनेकडून मित्रपक्षांना द्यावयाच्या ९ जागा धरून त्यांना जवळपास १३० जागा सोडण्याची तयारी दर्शविल्याचे कळते. शिवसेना नेतृत्व मात्र हा आकडा आणखी वाढावा यासाठी भाजपच्या दिल्लीतील नेतृत्वाशी संपर्कात असल्याचे खात्रीलायक गोटातून कळते. त्याचवेळी, आज, रविवारी मुंबईत दाखल होणारे भाजप अध्यक्ष अमित शहा हे युतीबाबतचा अंतिम निर्णय जाहीर करण्याची चिन्हे आहेत.
भाजप स्वबळावर लढल्यास त्यांच्या दीडशेच्या वर जागा निवडून येऊ शकतात असे सर्वेक्षण असल्याने प्रसंगी भाजपने स्वबळावर लढावे असे त्यांचे म्हणणे आहे. मात्र युती व्हावी यासाठी खुद्द मुख्यमंत्री फडणवीस आग्रही असून त्यासाठी शिवसेनेला जागा वाढवून देण्याबाबत ते देखील केंद्रातील नेत्यांशी सातत्याने संपर्कात असल्याचे कळते. शनिवारी देखील राज्यातील शिवसेना भाजप नेतृत्वामध्ये युतीबाबत चर्चा झाल्याचे कळते. रात्री उशिरादेखील या दोन्ही नेत्यांमध्ये बैठक होणार असल्याचे कळते.
शिवसेनेला सोबत ठेवण्यासाठी ११५ नव्हे, तर सुमारे १३० जागा देण्याबाबत, तसेच स्वतःकडे सुमारे १५८ ते १६० जागा ठेवण्याबाबत भाजपचे नेतृत्व गांभीयाने विचार करीत असल्याचे समजते.






