
नवी दिल्ली: सध्या रणवीर सिंगचं नशीब फार जोरात सुरू आहे असे वाटते, त्याला कारणही तसंच आहे. रणवीर सिंगच्या ‘गल्ली बॉय’ या चित्रपटाची भारतातर्फे ऑस्कर साठी नामांकित करण्यात आले आहे. हा सिनेमा भारताकडून ९२व्या ऑस्कर पुरस्कारासाठी पाठविण्यात येणार आहे. ‘बेस्ट इंटरनॅशनल फिचर फिल्म’ या कॅटेगरीसाठी गली बॉयची भारताकडून निवड करण्यात आली आहे.
‘गली बॉय’ या सिनेमात रणवीर सिंग आणि अभिनेत्री आलिया भट्टची प्रमुख भूमिका आहे. झोया अख्तरने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. या आधी मेलबर्नमध्ये पार पडलेल्या भारतीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये गली बॉयला सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार देण्यात आला होता. त्याशिवाय दक्षिण कोरियातील २३ व्या बुकियॉन इंटरनॅशनल फॅन्टॅस्टिक फिल्म फेस्टिव्हलमध्ये नेटवर्क फॉर द प्रमोशन ऑफ एशियन सिनेमाचा पुरस्कारही गली बॉयला मिळाला होता. धारावीतील एका स्लम रॅपर्सच्या जीवनावर आधारित हा सिनेमा आहे.
‘गली बॉय’सह ‘उरी द सर्जिकल स्ट्राइक’, ‘केसरी’, ‘बधाई हो’, ‘आर्टिकल १५’ आणि ‘अंधाधून’ आदी चित्रपट ऑस्करवारीच्या स्पर्धेत होते. मात्र या सर्व सिनेमावर गली बॉयने मात केली आहे.





