
पुणे : परतीच्या पावसाने पुणे शहर आणि ग्रामीण या दोन्हीही भागात झोडपून काढले. ढग फुटीसारख्या पावसाने अरण्येश्वर परिसरात पुराच्या पाण्यात पाच जण वाहून गेले तर भिंत कोसळून चार जण दगावले आहेत.
पुण्यातील अनेक वस्त्यांमध्ये पाणी घराच्या आत शिरले, नागरिकांनी घाबरून रात्र जागून काढली. आतापर्यंत रौद्र रूप धारण करत पावसाने एकूण ९ जणांचे बळी घेतल्याची माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त डी. वेंकटेशम यांनी दिली. रात्री अरण्येश्वर परिसरातील टांगेवाले कॉलनीत प्रथम पाच जणांचे मृतदेह आढळले. तर ३ ते ४ जण वाहून गेल्याची भीती व्यक्त होत होती. मात्र, मृतांचा आकडा ९ वर पोहोचला आहे. दरम्यान, कात्रज परिसरात नवीन बोगद्याजवळ महामार्गावर दरड कोसळल्यामुळे पुणे-बेंगळुरू महामार्गावरील वाहतूक ठप्प आहे.
दांडेकर वस्ती, आंबील ओढा परिसरातील घरांत पाणी शिरल्यामुळे तेथील रहिवाशांना राष्ट्र सेवा दलाच्या निळू फुले कला मंदिरात हलविण्यात आले आहे.
राजकीय पक्ष व सामाजिक कार्यकर्त्यांनीही धाव घेऊन नागरिकांना मदत केली. या भागातील सोसायट्यांमधील नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली होती.






