प्रचार थंडावला; आता लक्ष छुपा प्रचार आणि मतदानाकडे

मुंबई: भर पावसात रोड शो, रॅली आणि सभांच्या माध्यमातून सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या तोफा डागत प्रचाराचा शेवटचा दिवस गाजवला. भाजपचे राष्ट्रीय अमित शहा, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या शक्तिप्रदर्शनाने आज विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या.

प्रारंभी सर्वच उमेदवारांचा धिम्या गतीने प्रचार सुरू होता, मात्र मतदानाला तीन-चार दिवस राहिल्यानंतर प्रचाराने वेग घेतला. छोट्या प्रचारसभा, चौक सभा, मोठ्या सभा, रोड शो, रॅली, पदयात्रा आणि वैयक्तिक भेटीगाठींवर सर्वच उमेदवारांनी जोर दिला होता. बडे राजकीय नेते आणि सेलिब्रिटीजना आपल्या मतदारसंघात आणून अनेक उमेदवारांनी वातावरण ढवळून काढले. आजही प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर शक्तिप्रदर्शन करत सर्वच उमेदवारांनी मतदारसंघ पिंजून काढले. 

युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी भर पावसात वरळीत रोड शो केला, तर प्रकाश आंबेडकर यांनी आकोल्यात पावसामध्ये रॅली काढली. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही बारामतीत भर पावसात सभा घेतली. अजित पवार यांच्या प्रचारासाठी खुद्द शरद पवार यांनी बारामती गाठून जोरदार बॅटींग केली. 

सोमवारी २१ ऑक्टोबर रोजी राज्यात २८८ जागांसाठी मतदान होणार आहे. त्यानंतर २४ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे सर्वच उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. मतदानाच्या एक दिवस आधी आज सर्वच पक्ष छुपा प्रचार करून भेटीगाठी वर भर देवून आपला प्रचार करण्यावर भर देतील. दरम्यान निवडणूक आयोगाची सगळ्याच पक्षावर करडी नजर असणार आहे आहे.