
मुंबई : सध्या महाराष्ट्रात सत्ता नाट्यातील घडामोडी एव्हढ्या वेगाने घडत आहेत की क्षणा क्षणाला नाट्यमय वळणं घेताना दिसत आहे. भाजपाने राज्यपालांनी सत्तास्थापणेस दिलेल्या निमंत्रणानंतर राज्यातील दुसरा मोठा पक्ष आणि मुख्यमंत्री पदावरून भाजपाशी दोन हात केलेल्या शिवसेनेस सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिले आहे. यादरम्यान अजूनही वेळ गेली नसून भाजपाने 50 – 50 चा प्रस्ताव द्यावा , आम्ही अजूनही युती तोडलेली नाही असे वक्तव्य उध्दव ठाकरे यांनी शिवसेनेच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर केले आहे.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिवसेनेस एन डी ए मधून बाहेर पडावे असे आवाहन केले आहे. उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्याशी फोन वरून चर्चा केली असून शिवसेनेचे खासदार संजय राऊत सोनिया गांधी यांच्या भेटीसाठी दिल्लीला जाणार आहेत असल्याचे खात्रीशीर सूत्रांकडून समजते. उद्या संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत शिवसेनेस सत्ता स्थापन करण्याबाबत मुदत देण्यात आली आहे. मातोश्री वर शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांची चर्चा सुरू झाली असून एन डी ए मधून बाहेर पडण्याबाबत तसेच शिवसेनेचे खासदार आणि केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांना राजीनामा देऊन सारकारमधून बाहेर पडण्यासाठी सांगण्यात आलं आहे. तसेच सत्ता समीकरण जुळविण्यासाठी शिवसेना राज्यपालांकडे अजून मुदत वाढवून मागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. भाजपाने विरोधी पक्षात बसण्याची भूमिका घेवून शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. आता शिवसेनेची सगळी भिस्त राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष यांच्या भूमिकेवर अवलंबून आहे.






