
मुंबई: राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी भाजपा, शिवसेना नंतर आता तिसरा मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला निमंत्रण दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि शिष्टमंडळ यांनी राजभवनार जाऊन राज्यपालांची भेट घेतली आणि सत्ता स्थापन करण्याबाबत आपलं मत मांडले.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुद्धा शिवसेनेप्रमाणे चोवीस तासांचा अवधी देण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळात अजित पवार, धनंजय मुंडे, जयंत पाटील, छगन भुजबळ , दिलीप वळसे पाटील आदी नेत्यांचा समावेश होता. राज्यपालांना उद्या राष्ट्रवादी काँग्रेस आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. उदया संध्याकाळी साडे आठ वाजेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसला मुदत देण्यात आली आहे. उद्या काँग्रेस सोबत चर्चा करून राष्ट्रवादी काँग्रेस सत्ता स्थापनेबाबत आपली भूमिका स्पष्ट करणार आहे.
दरम्यान राष्ट्रीय काँग्रेसचे दोन केंद्रीय नेते मल्लिकार्जुन खरगे आणि वेणूगोपाल उद्या मुंबईत येणार आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत बैठक घेणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची सुद्धा उध्या सकाळी अकरा वाजता बैठक होणार आहे. यामुळे आघाडीच्या गोटात प्रचंड प्रमाणात उलथापालथ होत असून अशा परिस्थितीत शिवसेना काय भूमिका घेणार हे महत्त्वाचं ठरणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पटलावर दर दोन तीन तासात वेगवेगळ्या चाली पाहायला मिळत आहेत.






