
मुंबई: सत्तास्थापनेच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मतभेद असल्याचे उघड झाले आहे. काँग्रेससोबत आज कुठलीही बैठक नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. तर सत्तास्थापनेची आमची तयारी आहे. पण काँग्रेसचाच निर्णय झालेला नाही, असं सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी काँग्रेस नेतृत्वावर दिरंगाईचं खापर फोडलं आहे. तसंच जो काही निर्णय होईल तो एकत्रितच घेऊ, असंही त्यांनी स्पष्ट केले आहे. आता काँग्रेसचे दिल्लीतील नेते शरद पवार यांची भेट घेणार आहेत.
भाजपपाठोपाठ शिवसेनेलाही राज्यात सत्तेचा दावा करण्यात अपयश आल्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अखेर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली आहे. राज्यपालांनी तसं पत्रंच केंद्रीय गृहमंत्रालयाला दिलं आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आल्याची घोषणा केली जाऊ शकते.

शिवसेना कोर्टात जाणार
भाजपने सत्तास्थापनेस असमर्थता दर्शविल्यानंतर राज्यपालांनी रविवारी संध्याकाळी दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष म्हणून शिवसेनेला सत्तास्थापनेचं आमंत्रण दिलं होतं. मात्र, त्यासाठी २४ तासांची मुदत दिली होती. दिवसभरात घडामोडी वेगानं घडत होत्या. शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना नेत्यांच्या शिष्टमंडळानं राज्यपालांची भेट घेतली होती. शिवसेनेच्या आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र सादर करून सत्तास्थापनेचा दावा केला आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याचं पत्र देण्यासाठी तीन दिवसांचा कालावधी वाढवून द्यावा, अशी विनंती केली होती. मात्र, राज्यपालांनी त्यास नकार दिला. राज्यपालांच्या या निर्णयाविरोधात शिवसेनेच्या वतीनं अनिल परब यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. शिवसेनेला फक्त २४ तासांचा अवधी दिला, मात्र, भाजपला सत्तास्थापनेसाठी ४८ तासांची मुदत देण्यात आली होती. हा पक्षपातीपणा असून, त्यांनी भाजपच्या आदेशानुसार घाई केली आणि आम्हाला सत्तास्थापनेसाठी संधी दिली नाही, असा आरोप केला आहे. शिवसेनेच्या या याचिकेवर तात्काळ सुनावणी घेण्याची विनंतीही शिवसेनेनं केली आहे.






