PMC बँक घोटाळा: राजकीय कनेक्शन? सरदार तारासिंग यांच्या पुत्रास अटक

मुंबई: पंजाब अँड महाराष्ट्र बँक घोटाळ्यातील पहिलं राजकीय कनेक्शन उघड झालं असून भाजपचे माजी आमदार सरदार तारासिंग यांचे पुत्र राजनीत सिंग यांना आज मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. पीएमसी बँक घोटाळ्यातील ही आतापर्यंतची नववी अटक आहे. दरम्यान, राजनीतला उद्या सुट्टीकालीन कोर्टात हजर करण्यात येईल व पोलीस कोठडीची मागणी करण्यात येईल.

एचडीआयएल समूहाला देण्यात आलेल्या कर्जप्रकरणी पोलिसांनी राजनीत यांची कसून चौकशी केली. एचडीआयएल समूहातील कंपन्यांना कशाप्रकारे कर्ज देण्यात आले. हे कर्ज वसूल करण्यासाठी कोणती पावले उचलण्यात आली, अशी विचारणा पोलिसांनी राजनीत यांच्याकडे केली. मात्र, राजनीत यांच्याकडून देण्यात आलेली उत्तरं असमाधानकारक होती. त्यांनी दिलेले स्पष्टीकरण पटणारे नव्हते. त्यामुळेच त्यांचा या घोटाळ्यात सहभाग असण्याचा संशय बळावला असून त्या संशयावरूनच त्यांना अटक करण्यात आल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

पीएमसी बँकेतील ४ हजार ३५५ कोटींच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी आतापर्यंत ९ जणांना अटक करण्यात आली आहे. बँकेचे तीन वरिष्ठ अधिकारी, एचडीआयएल समूहाचे प्रवर्तक राकेश आणि सारंग वाधवान व ऑडिटर्सचा यात समावेश आहे. बँकेचे अधिकारी, बँकेचे संचालक आणि एचडीआयएल समूह यांनी संगनमताने हा घोटाळा केल्याचा संशय असून त्यादिशेनेच आर्थिक गुन्हे शाखेचा तपास सुरू आहे.