
नवी दिल्ली: महाराष्ट्रातील सत्ता नाट्य समाप्तीनंतर प्रथमच राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांनी भाजप वर जोरदार टीका केली आहे. काँग्रेसच्या संसदीय पक्षाची बैठक आज, गुरुवारी झाली. या बैठकीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षासह विविध मुद्द्यांवरून भाजप आणि मोदी सरकारवर जोरदार टीका केली. भाजपनं महाराष्ट्रातील लोकशाही नष्ट करण्याचे केलेले प्रयत्न लज्जास्पद होते, असं त्या म्हणाल्या. महाराष्ट्रात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भाजपच्या इशाऱ्यावर काम केलं. भाजपचं हे कृत्य लज्जास्पद आहे. महाविकास आघाडी तोडण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले गेले, असंही त्या म्हणाल्या.
महाराष्ट्रातील काँग्रेस नेते आणि शिवसेनेनं राज्यपालांवर पक्षपातीपणाचा आरोप केल्यानंतर आता काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनीही त्यांच्यावर टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या इशाऱ्यावरच राज्यपालांनी काम केलं यात शंकाच नाही, असं त्या म्हणाल्या. शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची महाआघाडीचं सरकार येण्यापासून रोखण्याचे सगळे प्रयत्न केले गेले. आम्ही सुप्रीम कोर्टात धाव घेतली आणि मोदी-शहा सरकारचा पर्दाफाश झाला, असंही त्या म्हणाल्या.
दरम्यान आदित्य ठाकरे यांनी सोनिया गांधी यांची भेट घेऊन त्यांना महाराष्ट्र विकास आघाडीच्या मुख्यमंत्री शपथ विधी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले.






