
मुंबई : नव्या सरकारचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली. राज्यपालांच्या सूचनेनुसार बहुमत सिद्ध करण्यासाठी दोन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं होतं. त्यानुसार सभागृह सुरू झाल्यानंतर सुरुवातीचं कामकाज आटोपल्यानंतर काँग्रेसचे सदस्य अशोक चव्हाण यांनी उद्धव ठाकरे सरकारवरील विश्वासाचा प्रस्ताव मांडला. त्याला सत्ताधारी बाकावरील आमदार नवाब मलिक, जयंत पाटील व सुनील प्रभू यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर आवाजी मतदान घेऊन शिरगणतीद्वारे मतदान घेण्यात आले. मतदान सुरू होताच भाजपच्या सदस्यांनी सभात्याग केला. त्यानंतर अध्यक्षांच्या सूचनेनुसार सभागृहाचे दरवाजे बंद करून गणती करण्यात आली. विश्वास ठरावाच्या बाजूनं १६९ मतं पडली आणि विरोधात शून्य मतं पडली. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, माकपचे प्रत्येकी एक आणि एमआयएमचे दोन असे चार सदस्य तटस्थ राहिले. त्यामुळं हा ठराव उद्धव ठाकरे सरकारनं १६९ विरुद्ध ० मतांनी जिंकला.






