महा विकास आघाडीचा मंत्री मंडळ विस्तार आज

मुंबई: सत्तेत आल्यानंतर अनेक दिवसांचा काळ लोटल्यानंतर अखेर महाराष्ट्रविकासआघाडी सरकारचा पहिला आणि बराच काळ लांबलेला मंत्रिमंडळ विस्तार आज म्हणजेच सोमवारी होणार आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी या शपथविधी सोहळ्यामध्ये मंत्र्यांना शपथ देतील.

विरोधकांची टीका आणि लांबलेला मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर निकाली निघण्याची वेळ समीप आली आहे. मंत्रिमंडळाच्या या विस्तारामध्ये शिवसेनेचे १३ मंत्री शपथ घेतील. ज्यामध्ये १० कॅबिनेट आणि ३ राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे १३ मंत्री या शपथविधी सोहळ्यात शपथ घेतील. यामध्ये १० कॅबिनेट आणि ३ राज्यमंत्री शपथ घेणार आहेत. काँग्रेसचेही १० मंत्री आज शपथ घेणार असून, यात ८ कॅबिनेट आणि २ राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. राष्ट्रवादीच्या ज्या नेत्यांची नावं निश्चित करण्यात आली आहेत.

दुपारी एक वाजल्यापासून विधानभवनाच्या समोर असणाऱ्या प्रांगणात हा विस्तार पार पडणार आहे. यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सहा मंत्र्यांनी २८ नोव्हेंबरला शपथ घेतली होती. त्यानंतर महिनाभरापासून सात मंत्रीच राज्याचा कारभार पाहत आहेत.