
खाते वाटप रखडले … काँग्रेस मध्ये गोंधळ
मुंबई: माहाविकास आघाडीचा मंत्री मंडळ विस्तार झाला आणि नाराजी नाट्य सुरू झालं. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या तिनही पक्षात मंत्री पद न मिळाल्याने नाराजीने डोकं वर काढलं आहे. यामागे खरं कारण मंत्री पद न मिळाल्याची नाराजी आहे की विविध महामंडळावर वर्णी लागण्या करिता दबावतंत्र आहे?
महाविकास आघाडीने पहिल्या टप्प्यात सहा आणि नंतर ३६ मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश केला. त्यामुळे नियमानुसार निर्धारित केलेल्या ४३ मंत्र्यांची जागा भरण्यात आली. त्यास्थितीत जोवर मंत्रिमंडळात फेरबदल होत नाही, तोवर नाराजांना त्यात समाविष्ट करता येणार नाही. त्यास्थितीत किमान मंत्रिपद मिळाले नाही तरी महामंडळाचे अध्यक्षपद मिळावे, यासाठी नाराज आमदारांनी मोर्चेबांधणी सुरू केलेली आहे.
सरकारमधील एकूण ४३ मंत्र्यांचा कोटाच पूर्ण झाला असल्याने नाराजांसाठी मंत्रिमंडळाचे दरवाजे कायमचे बंद झाले आहेत. त्यामुळे नाराजांना आता महामंडळावरच समाधान मानावे लागणार आहे. त्यामुळे महामंडळ अध्यक्षपद वाटपाच्या वेळी तरी नाराज आमदारांचा विचार करण्यात येईल, अशी अपेक्षा पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.
महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होण्यात संजय राऊत यांचा मोलाचा वाटा होता. सरकार स्थापनेच्या संपूर्ण प्रक्रियेत ते सुरुवातीपासून सक्रिय होते. शरद पवारांशी त्यांची असलेली जवळीक सरकार स्थापनेमध्ये महत्त्वाची ठरली असल्याचंही बोललं जातं. त्यामुळं महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांना मंत्रिपद मिळेल, अशी चर्चा होती. मात्र, शिवसेनेनं तीन अपक्षांना संधी दिल्यानं सुनील राऊत यांचं नाव मागे पडलं. त्यामुळं ते नाराज असल्याचं बोललं जात होतं. अर्थात, ही चर्चा त्यांनी फेटाळली होती.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन दोन दिवस उलटल्यानंतर आता काँग्रेसने ग्रामीण भागाशी निगडीत खात्यांची मागणी केली आहे. तर दुसरीकडे, महसूल खाते मिळविण्यासाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यात संघर्ष सुरू आहे. त्यामुळे खातेवाटपाचे घोडे अडले आहे.






