महाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणुका: महा विकास आघाडी जोरात, भाजपाला अनेक भागात धक्का

मुंबई : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस असे महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर या जिल्हा परिषद निवडणुका होत आहेत. यामुळे या निवडणूक निकालाची सर्वांना उत्सुकता आहे. जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीची सरशी होते की भाजपची हे या निकालातून स्पष्ट झाले आहे. खास करून नागपूरचा गड राखण्यात भाजपला यश आलेले नाही. तर धुळ्यात राष्ट्रवादीला दे धक्का देत भाजपने जोरदार मुसंडी मारली. तर पालघर जिल्ह्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना, राष्ट्रवादीने चांगली कामगिरी केली असून माकपनेही सहा जागा जिंगल्या आहेत.

राज्यातील सहा जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचे निकाल हाती येऊ लागले आहेत. नागपूर, धुळे, पालघर, नंदुरबार, अकोला आणि वाशिम या जिल्हा परिषदांच्या निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी १० वाजल्यापासून सुरुवात झाली. या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक मोठा फटका  बसला आहे. तर भारिप, माकप यांनी चांगले यश संपादन केले आहे. तर शिवसेना आणि राष्ट्रवादीने चांगली कामगिरी केली आहे. तसेच काँग्रेस-राष्ट्रवादीने नागपुरात दमदार कामगिरी करताना भाजपला जोरदार झटका दिला आहे. पालघरमध्ये शिवसेना-राष्ट्रवादीने भाजपला दणका दिला आहे. तर धुळ्यात भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे.

वाशीम जिल्हा परिषद निकाल : चार मुख्य पक्षांना मागे टाकत वंचित, जनविकास आघाडीने बाजी मारली आहे. या ठिकाणी त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे येथे कोणाची सत्ता येणार याची उत्सुकता आहे. याठिकाणी महाविकास  आघाडीची सत्ता येण्याची शक्यता आहे.  मात्र, भाजपने वंचित आणि जिल्हा जनविकास आघाडीला सोबत घेतले तर त्यांनाही सत्ता मिळू शकते. 

उस्मानाबाद जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीत धक्कादायक घडमोडी पाहायला मिळाल्यात. शिवसेनेचे माजी मंत्री तानाजी सावंत यांनी बंडखोरी केल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी भाजपशी हातमिळवणी केली. दरम्यान, येथील जिल्हा परिषदेमध्ये भाजपचा एकही सदस्य नसताना त्यांनी भाजपसोबत हातमिळवणी केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. आता शिवसेना काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे. उस्मानाबाद जिल्हा परिषद हातची गेल्याने शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

नाराज तानाजी सावंत यांच्या निमित्ताने शिवसेनेत उभी फूट पडल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत. त्यामुळे येथे महाविकास आघाडी अपयश आले. जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीत तानाजी सावंत यांच्या गटाने भाजपला मदत केल्याने सत्तेत परिवर्तन झाले आहे. महाविकास आघाडीचा फॉर्म्युला फोल ठरला आहे.