गिरगावात मनसेच भगव वादळ; मोर्चा काढून आम्हाला ताकत दाखवू नका, बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना हाकलून द्या – राज ठाकरे

मुंबई: नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात (CAA) मोर्चे काढणाऱ्यांना आज आम्ही फक्त मोर्चा काढून प्रत्युत्तर दिले आहे. मात्र, यापुढे जास्त नाटकं कराल तर दगडला दगडाने आणि तलवारीला तलवारीने प्रत्युत्तर देऊ, अशी गर्जना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली.

राज ठाकरे यांनी सीएएला विरोध तर एनआरसीचं समर्थन केल्याची भूमिका घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानी आणि बांग्लादेशी घुसखोऱ्यांविरोधात आज मनसेचा मुंबईत मोर्चा निघाला. 

पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांना देशातून हुसकावून लावण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (मनसे) रविवारी मुंबईत मोर्चा काढण्यात आला. यानंतर राज ठाकरे यांनी आझाद मैदानावर मनसेच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले. 

CAA विरोधात मुस्लिम समाजाकडून काढण्यात येणाऱ्या मोर्चांचा मला अर्थच लागत नाही. देशभरात CAA किंवा NRC कायदा लागू झाला तरी जन्मापासून येथे राहणाऱ्यांना कोण बाहेर काढणार? मग मुस्लिम समाज मोर्चे काढून कोणाला आपली ताकद दाखवू पाहत आहे, असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला. दगडाला दगडाने आणि तलवारीला तलवारीने उत्तर दिले जाईल, असे राज ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. 

कुणीही येतात कुठेही राहतात. भारताने माणुसकीचा ठेका नाही घेतलेला नाही. माझा देश म्हणजे काय धर्मशाळा वाटली काय, अशा शब्दात राज ठाकरे यांनी हल्लाबोल केला. आज दिवसभर मनसेच्या मोर्चाने लक्ष वेधले असताना राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आझाद मैदानावर राज ठाकरे यांनी बांग्लादेशी, पाकिस्तानी घुसखोरांवर हल्लाबोल केला. सोबतच सीएए समर्थनार्थ मोर्चे काढणाऱ्यांवर देखील टीका केली.

आपल्या भाषणात राज ठाकरे म्हणाले की, ज्यावेळी केंद्राची चूक झाली तेव्हा मी टीका केली. चांगला काम केलं तेव्हा अभिनंदन केलं. मी टीका केली त्यावेळी भाजप विरोधक आणि अभिनंदन केलं तर समर्थक अशा टीका केल्या गेल्या. मधलं काही आहे की नाही? असा सवाल त्यांनी केला. ते म्हणाले की, अनेक मराठी मुसलमान तिथे दंगली होत नाही जिथे बाहेरून येत आहेत, तिथे गैरप्रकार होतात. फक्त बांग्लादेशी मुसलमान नाही तर नायजेरियन घुसखोरांनी वसई-विरार-मिरा-भाईंदर इथे उन्माद घातला आहे. ते ड्रग्स विकतात, माता भगिनींची छेड काढतात. या लोकांचा बंदोबस्त करायला हवा, असं ते म्हणाले.

या मोर्चात मनसे अध्यक्ष राज ठाकरे सहकुटुंब सहभागी झाले. अमित ठाकरे मनसेच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच मोर्चात सहभागी झाले. पुणे, नाशिक, औरंगाबाद, सोलापूरमधून मनसैनिक मुंबईत दाखल झाले होते. आझाद मैदानावरही कडेकोट सुरक्षाव्यवस्था करण्यात आली होती.

आजच्या या मनसेच्या मोर्चा ने मुंबईत जणू भगव वादळ निर्माण झाले होते. या गर्दीच रुपांतर मतात होणार का हे येणारा काळ सांगेल.