वारीस पठाण यांनी ते वादग्रस्त वक्तव्य मागे घेतले

मुंबई: कर्नाटकातील गुलबर्गा येथे सीएए विरोधी आंदोलनातील वारिस पठाण यांच्या भाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. देशातील १५ कोटी मुस्लिम १०० कोटी हिंदूंवर भारी पडतील, अशा आशयाचे विधान पठाण यांनी या व्हिडिओत केले असून त्यावरून देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे या पक्षांनी पठाण यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत त्यांच्याविरुद्ध ठिकठिकाणी आंदोलन केले. पठाण यांच्या या प्रक्षोभक भाषणाची गंभीर दखल घेत पक्षानेही त्यांना प्रसारमाध्यमांशी बोलण्यास मनाई केली होती. 

आम्ही १५ कोटी १०० कोटींवर भारी’ हे विधान अखेर एमआयएम प्रवक्ते व माजी आमदारवारिस पठाण यांनी मागे घेतले आहे. मी सर्व धर्मांचा आदर करतो. मी कधीही कोणत्या धर्मावर टीका केलेली नाही. तरीही माझ्या विधानाने कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माझे विधान मागे घेतो, असे पठाण यांनी नमूद केले.

मी भारतीय असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. मी एक सच्चा मुसलमान आहे. इमानदारीची शिकवण मला बालपणापासून मिळालेली आहे. हिंदू, दलित, शीख, पारसी वा कोणताही धर्म असो मी सर्वच धर्मांचा व हे धर्म मानणाऱ्यांचा आदरच केला आहे. तरीही माझ्या विधानाने कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माझे विधान मागे घेतो व खेद व्यक्त करतो, असे स्पष्टीकरण पठाण यांनी दिले आहे.

माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढून मला लक्ष्य करण्यात आले. हे मला तसेच माझ्या पक्षाला बदनाम करण्याचे राजकीय षडयंत्र आहे, असा आरोपही पठाण यांनी केला.