
पर्थ : हरमनप्रीत कौरच्या भारतीय महिला संघानं ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात ऑस्ट्रेलियापाठोपाठ बांगलादेशलाही धूळ चारली. अ गटातल्या आपल्या दुसऱ्या साखळी सामन्यात भारतानं बांगलादेशचा 18 धावांनी पराभव केला. भारताचा विश्वचषकातला हा सलग दुसरा विजय ठरला.
साखळी फेरीच्या तिसऱ्या सामन्यात भारताचा सामना आता न्यूझीलंडशी होणार आहे. येत्या गुरुवारी मेलबर्नच्या जंक्शन ओव्हल मैदानावर भारतीय वेळेनुसार सकाळी साडेआठ वाजता सामन्याला सुरुवात होईल. अ गटातून उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या दृष्टिनं भारताला हा सामना जिंकणं गरजेचं आहे. या सामन्यासाठी स्मृती मानधना संघात परतणार आहे.
या सामन्यात भारतानं शेफाली वर्मा आणि जेमिमा रॉड्रिग्सच्या दमदार खेळीमुळे 20 षटकांत 142 धावा उभारल्या होत्या.
143 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्य़ा बांगलादेशनं चांगली सुरुवात केली होती. 10 षटकांत 2 बाद 60 अशा चांगल्या स्थितीत असलेल्या बांगलादेशला पुन्हा एकदा लेग स्पिनर पूनम यादवनं आपल्या जाळ्यात ओढलं. त्यानंतर ठराविक अंतरानं बांगलादेशची फलंदाजी ढेपाळत गेली. त्यामुळे बांगलादेशला 20 षटकांत आठ बाद 124 धावाच करता आल्या.










