दिल्ली हिंसाचार प्रकरणी काँग्रेसचं राष्ट्रपतींना निवेदन; दिल्ली हिंसाचारात आतापर्यंत 34 ठार

नवी दिल्ली : दिल्ली हिंसाचार प्रकरणात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या शिष्टमंडळानं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेत त्यांना निवेदन दिलं. दिल्लीत सरकारकडून राजधर्माचं पालन झालं नसल्याचा गंभीर आरोप सोनिया गांधीं यांनी केला आहे. हिंसाचारादरम्यान केंद्र आणि दिल्ली सरकार मूक दर्शक बनली. हिंसा सुरू असताना सरकारकडून कुठलही पाऊल उचललं गेलं नाही, असा आरोप सोनिया गांधी यांनी केला आहे. तसेच गृहमंत्री अमित शाहांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम असल्याचा पुनरुच्चारही सोनिया गांधी यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे.

काँग्रेसच्या वतीने सोपवण्यात आलेल्या निवेदनात सांगण्यात आलं आहे की, ‘आम्ही पुन्हा एकदा अशी मागणी करत आहोत की, अमित शहांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा. कारण हिंसा रोखण्यासाठी ते असक्षम ठरले आहेत.’ तसेच निवेदनात पुढे म्हटलं आहे की, ‘आम्ही तुमच्याकडे मागणी करतो की, ‘नागरिकांचं जीवन, संपत्ती आणि स्वातंत्र्य अबादित ठेवण्यात यावं. आम्ही अशी आशा करतो की, तुम्ही निर्णायक पाऊल उचलाल.’

दिल्लीमधील हिंसाचारात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 34 वर पोहोचली आहे. या हिंसेमध्ये 200 पेक्षा जास्त लोक गंभीर जखमी झाले आहेत. जाफराबाद, मौजपूर, बाबरपूर, यमुना विहार, भजनपुरा, चांद बाग, शिव विहार या ठिकाणांवर हिंसाचाराचा सर्वाधिक परिणाम झाला आहे. दरम्यान, पोलिसांनी सांगितले की, ‘काल संध्याकाळपासून हिंसाचाराची कोणतीही घटना समोर आलेली नाही. पोलिसांनी आतापर्यंत 18 एफआयआर वेगवेगळ्या स्थानकांमध्ये दाखल केले आहेत. आतापर्यंत हिंसा पसरवणाऱ्यांमध्ये ज्या आरोपींची ओळख पटली आहे अशा 106 जणांना अटक करण्यात आली आहे.