राज्यात मुस्लिम आरक्षणासाठी सरकार लवकरच अध्यादेश काढणार

मुंबई : मुस्लीम आरक्षणासाठी सरकार अध्यादेश काढणार असल्याची घोषणा अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी आज विधान परिषदेत केलीय. शरद रणपिसे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना न्यायालयाच्या निर्णयाच्या अधिन राहून आरक्षणासंदर्भातील अध्यादेश काढला जाईल, असं मलिकांनी म्हटलंय. सुरुवातीला शैक्षणिक आरक्षणासाठी कायदा करण्यात येईल आणि त्यानंतर नोकरी आणि खासगी शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षणासाठी कायदा करु, अशी घोषणा मलिकांनी केलीय.

आज विधान परिषदेत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना मुस्लीम आरक्षणावरुन घेरल्याचं पाहायला मिळालं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुस्लीम आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केली. तर, मुस्लीम आरक्षणाबाबत निर्णय कधी घेणार, असा प्रश्न शरद रणपिसे यांनी विचारला. याला उत्तर देताना 2014 ला जसा अध्यादेश होता, तसाच अध्यादेश काढून त्याचे कायद्यात रूपांतर करू, असं उत्तर नवाब मलिक यांनी दिलंय. मुस्लीम आरक्षणाबाबत उच्च न्यायालयाने जे मान्य केलं आहे. ते लक्षात घेऊन राज्यात लवकरात लवकर मुस्लीम आरक्षण देण्याबाबत कायदा करण्याचंही त्यांनी आश्वासन दिलं.