
मुंबई: कोरोना व्हायरसमुळं चीनची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय पातळीवरही पाहायला मिळत आहे. जगभरातील मार्केटमध्ये अस्थिरता असल्यानं सुरक्षित गुंतवणूक म्हणून लोक सोनं खरेदीकडे वळले आहेत. त्यामुळं गेल्या तीन महिन्यात सोनं तब्बल सहा हजारांनी वधारलंय. सध्या सोन्याचा भाव प्रति तोळा 43 हजाराच्या आसपास पोहोचला आहे. कोरोनाचा विळखा कमी झाला नाही तर सोनं 46 हजारांवर जाण्याची शक्यता आहे. लग्नघराला मात्र याचा मोठा फटका सहन करावा लागणार आहे.
जागतिक बाजारातील घसरणीचा भारतीय शेअर बाजारावर परिणाम होणार आहे. अमेरिकेत डाऊ मार्केटमध्ये दिवसभरातील सर्वात मोठी घसरण आहे. जपानची निक्केई मार्केट 2.5 टक्के घसरण झाली आहे. करोनो मुळे जुलै ऑगस्टमधील ऑलंम्पिक रद्द होईल या भीतीने बाजार घसरला आहे. ऑस्ट्रेलियात तीन टक्के तर दक्षिण कोरियातील शेअर बाजारात दिड टक्के घसरण झाली आहे.
जगभरातल्या शेअर बाजाराप्रमाणे मुंबईचाही शेअर बाजार कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. बंद होताना बाजारात 1 हजार 448 अंकाची घसरण पाहायला मिळाली. अवघ्या काही मिनिटांत गुंतवणुकदारांचे साडेपाच लाख कोटी बुडाले आहेत. जगात दुसऱ्या क्रमांकाची चीनची अर्थव्यवस्था पुरती कोलमडल्यानं गुंतवणुकीसाठी सोन्याला प्राधान्य देण्यात येतं आहे. त्यामुळं सोन्याचे दर 46 हजाराच्या घरात पोहोचण्याची शक्यता आहे.










