
ख्राईस्टचर्च : न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातही भारतीय फलंदाजांनी खराब कामगिरी कायम राखली आहे. या खराब कामगिरीमुळे टीम इंडिया पराभवाच्या उंबरठ्यावर आहे. रविवारचा दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत टीम इंडियाची अवस्था सहा बाद 90 अशी झालीये. टीम इंडियाला 97 धावांची आघाडी मिळाली आहे. दिवसभराचा खेळ संपेपर्यंत हनुमा विहारी 5 आणि रिषभ पंत 1 धाव करत नाबाद आहेत.
न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्डने तीन तर टिम साऊदी, कोलीन दे ग्रँडहोम आणि नील वॅगनर यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. दुसऱ्या डावात टीम इंडियाकडून चेतेश्वर पुजाराने सर्वाधिक 24 धावा केल्या आहेत. त्यापाठोपाठ पृथ्वी शॉ आणि कर्णाधार विराट कोहलीने प्रत्येकी 14 धावा केल्या आहेत. अजिंक्य रहाणेने 9, मयंक अगरवालने 3, उमेश यादवने 1 धाव केली.
दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला त्यावेळी भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजी करत पहिल्या सत्रापर्यंत न्यूझीलंडच्या पाच विकेट घेतल्या. त्यानंतर न्यूझीलंडची स्थिती आठ विकेटवर 188 धावा अशी होती. मात्र काईल जॅमिसन आणि नील वॅगनर यांच्या खेळीमुळे न्यूझीलंडने 235 धावापर्यंत मजल मारली.
उद्या जर का भारतीय संघाला पराभव टाळावा अस वाटत असेल तर आता ऋषभ पंत, विहिरी आणि जडेजा यांना कमीत कमी 150 धावांची भर घालावी लागेल. परंतु ही कामगिरी थोडी अवघडच दिसत आहे.











